Bikini Killer: गुन्हेगारी जगताला हादरवणारा चार्ल्स शोभराज कोण? 'बिकीनी किलर'चा चित्रपट कथेलाही लाजवेल असा थरारक प्रवास

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने १९ वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आणि गुन्हेगारी जगताला हादरवुन सोडणाऱ्या बिकीनी किलरची पुन्हा चर्चा सुरू झाली. तब्बल ९ देशांच्या पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चार्ल्स शोभराजच्या आयुष्याची कथा एखाद्या चित्रपट कथेला लाजवेल अशीच आहे.

नेपाळने चार्ल्स शोभराजला २००३ मध्ये दोन अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हेगारीच्या जगात 'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' अशी ओळख असलेल्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

व्हिएतनामी वंशाच्या चार्ल्स शोभराजचा जन्म 1944 मध्ये व्हिएतनामच्या होची मिन्ह शहरात झाला. त्याची आई व्हिएतनामची होती आणि वडील भारतीय वंशाचे होते. लहान वयातच चार्ल्सने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला होता. 1963 मध्ये शोभराजला चोरीच्या गुन्ह्यात पहिल्यांदा तुरुंगात जावे लागले होते. प्रथमच तो फ्रान्समधील पॉईसी तुरुंगात गेला.

फ्रान्सचे पॉईसी तुरुंग पॅरिस शहरापासून दूर एका निर्जन ठिकाणी होते. चार्ल्स भयंकर कैद्यांमध्ये कराटे तंत्राच्या मदतीने स्वतःचा बचाव करायचा. शोभराज या कारागृहात अत्यंत थंड डोक्याने राहायचा आणि हातवारे करून वस्तू विचारायचा. तुरुंगातून सुटल्यानंतर चार्ल्सने पॅरिसच्या उच्चवर्गीय समाजातील लोकांना त्याची शिकार बनवण्यास सुरूवात केली.

चार्ल्स शोभराजने त्याचा एक भारतीय साथीदार अजय चौधरी याच्यासोबत थायलंडमध्ये पहिला खून केला. 1975 मध्ये टेरेसा नॉल्टन नावाची पर्यटक बिकिनी परिधान केलेल्या अवस्थेत स्विमींग पुलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. चार्ल्सचा हा पहिला बळी होता. याच 70 च्या दशकात चार्ल्सने दक्षिण-पूर्व आशियामध्ये 12 पर्यटकांची हत्या केली. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून, गळा दाबून, चाकूने किंवा जिवंत जाळल्याने झाला होता. आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे चार्ल्स महिलांशी सहज मैत्री करत असे.

शोभराजने थायलंड, नेपाळ आणि भारतातील पर्यटकांना, विशेषतः बॅकपॅकर्सना लक्ष्य केले. तो अनेकदा त्यांच्याशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांना ड्रग्ज पदार्थ द्यायचा, त्यांच्या वस्तू आणि ओळखी चोरायचा. शोभराजला मीडिया आणि पोलिसांमध्ये बिकिनी किलर म्हणूनही ओळखले जात होते, कारण त्याच्या बळी सहसा सुट्टीच्या दिवशी बिकिनी घातलेल्या पर्यटक मुली होत्या. तो बिकिनी घातलेल्या मुलींना मारायचा, म्हणून त्याला 'बिकिनी किलर' हे नाव पडले. शोभराज संपूर्ण युरोप आणि आशियामध्ये अनोळखी लोकांना फसवण्यात आणि पोलिसांना चुकवण्यात पटाईत होता. म्हणूनच त्याला स्नेकही असेही म्हटले जात होते.

शोभराज अनेक भाषा बोलण्यात, सराईतपणे वेश बदलण्यात तसेच त्याच्या चार्मिंग व्यक्तिमत्वामुळे मुलींशी मैत्री करण्यात पारंगत होता. त्यामुळेच त्याच्या पाठीमागे ९ देशांचे पोलिस लागले होते. नेपाळमधील जेलमध्ये असतानाच त्याने एक मुलाखत दिली होती, ज्यानंतर नेपाळच्या प्रशानसनाला मोठा धक्का बसला होता.

1976 मध्ये चार्ल्सने भारत भेटीसाठी आलेल्या एका फ्रेंच ग्रुपची हत्या केली. या प्रकरणात, चार्ल्सला इस्रायली पर्यटकाच्या हत्येसाठी सात वर्षांची शिक्षा झाली. यानंतर 1986 मध्ये तो आपल्या साथीदारांसह तिहार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र तो पुन्हा पकडला गेल्यावर शिक्षा पूर्ण करून तो फ्रान्सला गेला. त्यानंतर नेपाळ दौऱ्यावर असताना त्याला पुन्हा अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा झाली.

२००५ मध्ये शोभराजच्या जीवनावर आधारित 'मैं और चार्ल्स' चित्रपटही प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अभिनेता रणदीप हुड्डाने प्रमूख भूमिका साकारली होती. फक्त बॉलिवूडमध्येच नव्हेतर नेटफ्लिक्सनेही शोभराजवर 'द सरपेंट' नावाची सिरीज काढली होती.

दरम्यान, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्याला 15 दिवसांच्या आत त्याच्या देशात पाठवण्यात यावे, असेही सांगितले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply