Apple Store In Mumbai : अॅपलचे भारतातील पहिले रिटेल स्टोअर मुंबईत, पहिली झलक समोर; लवकरच ग्रॅण्ड ओपनिंग

Apple Store In Mumbai : अॅपल (Apple) कंपनी लवकरच भारतात आपले पहिले रिटेल स्टोअरचे ओपनिंग करणार आहे. त्यांचे हे भारतातील अधिकृत रिटेल स्टोअर असून दक्षिण आशियातील अॅपलचे हे सर्वात मोठे पाऊल समजले जात आहे. अॅपलने भारतातील आपल्या पहिल्या रिटेल स्टोअरशी संबंधित एक फोटो देखील जारी केला आहे. विशेष बाब म्हणजे अॅपल भारतातील आपले पहिले रिटेल स्टोअर आर्थिक राजधानी मुंबईत सुरु करणार आहे. जिओ वर्ल्ड मॉलमध्ये अॅपलचे स्टोअर ओपन होणार आहे. परंतु अॅपलकडून नेमक्या कोणत्या तारखेला हे स्टोअर सुरु करण्यात येणार आहे, याची माहिती दिलेली नाही.  

अॅपलचे रिटेल स्टोअर अत्यंत आकर्षक आणि सुंदर

अॅपलचे रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसीच्या बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स येथे सुरु करण्यात येणार आहे. या स्टोअरची डिझाईन मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीसारखी असून स्टोअर दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहे. या स्टोअरच्या ओपनिंगमुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेलाही प्रोत्साहन मिळणार आहे. राजधानी मुंबईत हे स्टोअर सुरु होणार असल्यामुळे संपूर्ण मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. मुंबईतील मुकेश अंबानीच्या मालकीचे जिओ वर्ल्ड मॉलमध्ये या अॅपल स्टोअरची सुरुवात करण्यात येणार आहे.

अॅपल भारतात आधीपासूनच त्यांचे प्रॉडक्ट बनवत आहे. तसेच भारतातील मध्यमवर्ग-नवमध्यमवर्ग अॅपल प्रॉडक्टच्या खरेदीकडे वेगाने वळत आहेत. अशात अॅपलसाठी भारतीय स्मार्टफोन युझर्स आणि कम्प्युटर युझर्स असे दोन्ही वर्ग आकर्षणाचा केंद्र आहेत. हीच बाब लक्षात घेऊन अॅपल भारतात आपल्या स्टोअरचा विस्तार करत आहे.

भारतातील इतर स्मार्टफोन्ससोबत स्पर्धा 

भारतात आधीच स्मार्टफोन्सची संख्या जास्त असल्यामुळे अॅपलला तगडी स्पर्धा असणार आहे. भारतात अॅपलच्या ब्रॅंडचे आकर्षण असले तरी बजेटमध्ये मिळणारे स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या किंमतीशी अॅपलला स्पर्धा करावी लागणार आहे. भारत सरकारसोबतच्या वाटाघाटीनंतर अॅपल भारतात पहिले रिटेल स्टोअर सुरु करणार आहे. अॅपलला इथे येऊन बिजनेस थाटताना देशांतर्गत सप्लाय चेनच्या घटकांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण बिजनेसपैकी 30 टक्के पुरवठादार भारतातील असावे लागणार आहेत. त्यामुळे देशातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना याचा फायदा होईल. यासोबत देशातील रोजगारालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे मेक इंन इंडियाच्या मोहिमेतील हे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.

भारतातही इतर ठिकाणी अॅपल स्टोअरची सुरुवात

सध्या अॅपलने फक्त मुंबईत रिटेल स्टोअर ओपन करायचे ठरवले असले तरी भारतात अन्य शहरात त्यांचे अॅपल स्टोअर सुरु करण्यास उत्सुक आहे. मुंबईनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये अॅपल आपले दुसरे रिटेल स्टोअर ओपन करण्यास उत्सुक आहे. हे स्टोअर मुंबईतील बीकेसीच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लॅक्सपेक्षा लहान स्वरुपाचे असणार आहे. त्यासाठी अॅपलचे मुख्यकार्यकारी अधिकारी टॉम कुक भारतात येऊन स्टोअरच्या ओपनिंगला उपस्थित राहू शकतात. त्यांच्यासोबत भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्रीही हजर राहण्याची शक्यता आहे. गेल्या एक दोन वर्षापासूनच अॅपलने चीनमधून त्यांचे स्टोअर्स भारत आणि दक्षिण आशियायी देशात हलवण्याठी प्रयत्न सुरु केले होते. गेल्या अनेक काळापासून अॅपलने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे भारतात पहिल्या अॅपल स्टोअरची सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे पाऊल समजले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply