राजकीय घडामोडींना वेग! उद्धव ठाकरेंनी बोलवली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक; ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या शिंदेंच्या उपस्थितीबद्दल संभ्रम

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून या निवडणुकीत मतं फुटल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून या पराभवाची चाचपणी सुरु झाली आहे. असं असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही.

अशातच आता उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक आणि शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते असणारे एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत सर्वच गोष्टींपासून अलिप्त होते. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार सायंकाळपासूनच शिंदे आणि १३ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजल्यानंतर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या सेलिब्रेशनऐवजी बैठकीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित होते. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होती, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत.

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी घेतली भेट
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे नॉट रिचेबल असल्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊ उद्धव यांची भेट घेतल्याची माहितीही समोर येत आहे. अशातच आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला तरी एकनाथ शिंदे उपस्थित राहतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे स्पष्ट निर्देश ‘मातोश्री’वरुन देण्यात आले आहेत.

दहा दिवसात दुसरा धक्का…
भाजपाने या निवडणुकीच्या माध्यमातून १० दिवसांमध्ये दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला धक्का दिलाय. भाजपाचे पाचही उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले असून सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटल्याचा फायदा भाजपाला झाल्याचं सांगितलं जात आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्याइतकी मतं नसताना भाजपाने पाच उमेदवार निवडून आणण्याचा चमत्कार केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाला.

शिवसेनेवर नामुष्की
शिवसेनेचे संख्याबळ ५५ असून, तीन अपक्ष मंत्री व अन्य काही आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेला ६० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मतेच मिळाली. शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५५ असल्याने तीन मते फुटल्याचे स्पष्टच दिसते. शिवसेनेबरोबर असलेल्या सहयोगी आमदारांनी मते दिली असे गृहित धरल्यास शिवसेनेची अधिक मते फुटली असावीत. शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी मतांची फाटाफूट झाल्याने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेवर नामुष्की ओढवली.

राष्ट्रवादीची ती मतं कुठून?
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाल्याने राष्ट्रवादीने पाच अतिरिक्त मतांची बेगमी केली. ही मते महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची की भाजपाची, अशी चर्चा सुरू झाली.

भाजपाची मतं वाढली, सरकार स्थिर नाही स्पष्ट झाले
भाजपाचे १०६  आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपाला ११ मते अधिक मिळाली आहेत. शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपाला यश आले आहे. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले. विधान परिषदेत चमत्काराचे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते, पण भाजपानेच चमत्कार केला. राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीची मते फोडून भाजपाने सरकार डळमळीत होईल, अशा पद्धतीने पावले टाकली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ १५२ असल्याने या दोन्ही निकालांवरून सरकार लगेचच कोसळेल असे नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भरभक्कम किंवा स्थिर नाही हे स्पष्ट झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply