मुंबई : ‘सहारा’चा पुण्यातील भूखंड लवकरच म्हाडाकडे ; ५२ एकरची जमीन ३७६ कोटींना खरेदी करण्याचा निर्णय

मुंबई : सामान्यांच्या गृहप्रकल्पासाठी तीन-चार वर्षांपूर्वी जांभूळ येथे खरेदी केलेला ३५ एकर भूखंड पडून असतानाच कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक घोटाळय़ात अडकलेल्या सहारा इंडियाचा धानोरी येथील ५२ एकर भूखंड ३७६ कोटींना खरेदी करण्याचे पुणे म्हाडाने ठरविले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला प्राधिकरणाने मंजुरी दिली असली तरी या प्रस्तावात त्रुटी आहेत, असे कारण देऊन शासनाने हा प्रस्ताव मंजूर केलेला नाही.  भूखंडाच्या मालकीबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच हा भूखंड म्हाडाच्या नावावर होण्यास काहीच अडचण नाही, असे पुणे म्हाडाचे म्हणणे आहे.  

जांभूळ येथील ३५ एकर भूखंडासाठी रेडी रेकनरच्या तीन पट रक्कम मोजणाऱ्या म्हाडाने धानोरीतील भूखंडासाठी मात्र तेवढी किंमत मोजलेली नाही. धानोरीतील या भूखंडाचा फायदा म्हणजे पुणे रेल्वे स्थानक नऊ किलोमीटरवर तर पुणे विमानतळ तीन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी सहारा इंडियाच्या मालकीचा १०७ एकर भूखंड आहे. यापैकी ५२ एकर भूखंड म्हाडाने खरेदी करण्याचे ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहारा इंडियाला मालमत्ता विकण्यासाठी परवानगी दिलेली आहे, याचा फायदा उठवून म्हाडाने हा मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड भविष्यातील गृहप्रकल्पासाठी खरेदी करण्याचे ठरविले आहे, असे पुणे गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी सांगितले.

या ५२ एकर भूखंडाच्या मालमत्ता पत्रकावर कन्ट्री रिट्रीट १ (२२ एकर), तन्ना ग्रीन (२५ एकर), सहारा प्राइम सिटी (सहा एकर), अमृत विहार (सात एकर) अशी नावे आहेत. मात्र हे सर्व भूखंड सहाराच्या मालकीचे आहेत, असेही माने यांनी सांगितले. या भूखंडाबाबत पुण्यातील प्रतिष्ठित विकासक तसेच वकील यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला आहे. जांभूळ येथील भूखंड हा पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या हद्दीत असून पुण्यापासून खूप दूर आहे. त्या तुलनेत धानोरी परिसर पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. पुणे म्हाडाकडे असलेल्या एकूण ६३० हेक्टर भूखंडापैकी ५९६ हेक्टर भूखंडाचा वापर करण्यात आला आहे. शिल्लक राहिलेल्या ३४ हेक्टर भूखंडापैकी काही भागांवर आरक्षण तर काही प्रकरणांत न्यायालयीन लढाई सुरू आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत म्हाडाकडे भूखंडच नसल्यामुळे गेली १५ वर्षे एकही योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळेच सहाराचा हा भूखंड फायदेशीर ठरणार आहे, असा दावा माने यांनी केला आहे. 

धानोरी येथील बाजारभाव रेडी रेकनरच्या दोन ते तीन पट आहे. याशिवाय तीन इतके चटईक्षेत्रफळ मिळणार असल्यामुळे म्हाडाला घरनिर्मितीतून भरपूर फायदा मिळणार आहे. भूखंड संपादनाच्या नव्या कायद्यानुसार शहरातील भूखंडाला रेडी रेकनरच्या तीन पट दर द्यावा लागतो. परंतु सहाराकडून रेडी रेकनरच्या दरानुसार भूखंड मिळणार आहे. 

– नितीन मानेमुख्य अधिकारीपुणे गृहनिर्माण मंडळ



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply