मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म. ना. गोगटे यांचे निधन

मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक मधुकर नारायण ऊर्फ म. ना. गोगटे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे या त्यांच्या पत्नी होत.

गोगटे यांचा जन्म आणि इंटरपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बी.ई. (स्थापत्य अभियांत्रिकी) केल्यावर त्यांनी लंडन विद्यापीठामधून अभियांत्रिकीमध्ये एम.एस्सी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर १९५६ ते १९९६ अशी चार दशके त्यांनी वास्तुविशारद, व्हॅल्युअर आणि स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये स्वत:चा व्यवसाय करून लोकांसाठी घरे, व्यापारी आस्थापनांसाठी इमारती आणि उद्योगपतींसाठी कारखाने बांधले. ही कामे त्यांनी प्रामुख्याने मुंबईत केली, आणि तुरळकपणे उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात आणि बहारीन येथेही केली. १९७० ते १९८१ या काळात त्यांनी वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसाठी ‘बिल्डिंग प्रॅक्टिस’ नावाचे एक इंग्रजी अनियतकालिक चालविले.

१९६५ साली संघातून बाहेर पडले –

गोगटे १९६२-१९६६ या काळात मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. १९६३ साली स्थापन झालेल्या शास्त्रीय समितीचे ते कार्यवाह होते. त्या काळात विज्ञान विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने आयोजित केली होती. संघाच्या प्रादेशिक संमेलनात एक शास्त्रीय संमेलन भरवले होते. ‘मातीची धरणे’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. विज्ञानविषयक कार्यक्रमांची मांदियाळी सुरू झाल्यामुळे मुंबई मराठी साहित्य संघ ही साहित्य संस्था आहे की विज्ञान संस्था, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला. त्यातून मतभेद होऊन गोगटे १९६५ साली संघातून बाहेर पडले. डॉ. रा. वि. साठे, ज. ग. बोधे, डॉ. श्री. शां. आजगावकर, डॉ. म. आ. रानडे, प्रा. प. म. बर्वे, डॉ. चिं. श्री. कर्वे या समविचारी लोकांना घेऊन त्यांनी २४ एप्रिल, १९६६ रोजी मराठी विज्ञान परिषदेची स्थापना केली. दहा वर्षे ते परिषदेचे कार्यवाह होते.

मराठी विज्ञान परिषद वार्तापत्राची सुरुवात –

मुंबईनंतर पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, सांगली, मडगाव येथे त्यांनी परिषदेच्या शाखा निर्माण केल्या. त्या-त्या शाखांत भाषणे, चर्चा, परिसंवाद होऊ लागले. जानेवारी १९६७ पासून शाखांमध्ये होणाऱ्या कार्याची माहिती पोहोचावी म्हणून त्यांनी मराठी विज्ञान परिषद वार्तापत्राची सुरुवात केली. एप्रिल १९६८ मध्ये त्याचे रूपांतर मराठी विज्ञान परिषद पत्रिका असे केले. पहिल्याच वर्षी मराठी विज्ञान संमेलन झाले. संमेलनात वैज्ञानिकांचा सन्मान, वैज्ञानिक स्थळाला सहल, अनुवाद शिबिर हे उपक्रम सुरू केले.

१९७६ ते १९८२ परिषदेचे अध्यक्ष होते –

परिषदेची वास्तू व्हावी म्हणून १९७३ सालापासून शासनाशी पत्रव्यवहार सुरू करून १९७५ साली शीव-चुनाभट्टीला १००० चौ.मी.ची जागा मिळवली. आयकर विभागाकडून देणगीवर करमाफीची सवलत मिळवली आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि सांस्कृतिक खाते, तसेच मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान मिळवले. म. ना. गोगटे १९७६ ते १९८२ अशी सहा वर्षे परिषदेचे अध्यक्ष होते. नंतर ते परिषदेचे विश्वस्तही होते.

२००२ मध्ये परिषदेची पुण्यात शाखा स्थापन –

पुण्यात स्थायिक झाल्यानंतर गोगटे यांनी २००२ मध्ये परिषदेची शाखा स्थापन केली. ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’च्या पुणे शाखेबरोबर दरमहा व्याख्यानाचे कार्यक्रम सुरू केले. तर, राष्ट्रीय विज्ञान दिन’ कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेबरोबर सुरू केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply