पुणे शहर उपनगरातील नाट्यगृहांचे करायचे काय?

पुणे - शहरात महापालिकेची (Pune Municipal) एकूण चौदा नाट्यगृहे (Auditorium) असताना मध्यवर्ती भागातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णाभाऊ साठे स्मारक याच नाट्यगृहांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. उपनगरातील इतर नाट्यगृहांकडे रंगकर्मी आणि नाट्यरसिक फिरकतही नसल्याचे चित्र आहे. परिणामी, प्रमुख नाट्यगृहांवरील ताणही वाढत असून कोट्यवधी रुपये खर्च (Expenditure) करून उभी केलेली उपनगरांतील नाट्यगृहे मात्र नाटकांच्या प्रतीक्षेतच आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन, गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, औंध येथील पं. भिमसेन जोशी कलामंदिर, येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर अशा उपनगरातील महापालिकेच्या इतर नाट्यगृहांना वालीच नाही. या नाट्यगृहांमध्ये प्रेक्षक येत नसल्याने आणि नाटकासाठी आवश्यक त्या सुविधा नसल्याने इथे प्रयोग लावता येत नसल्याची तक्रार नाट्यनिर्माते करतात. मात्र, प्रयोग लावल्यावरच प्रेक्षक हळूहळू या नाट्यगृहांकडे वळतील, असे प्रत्युत्तर महापालिकेचे अधिकारी देतात. या टोलवाटोलवीत कोट्यावधी रुपये खर्चून उभ्या केलेल्या या नाट्यगृहांची परिस्थिती मात्र बिकट होत आहे.

याबाबत दिग्दर्शक राहुल लामखडे म्हणाले, ‘बालगंधर्व रंगमंदिर किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहांमध्ये सतत नाटके होत असल्याने प्रयोगांसाठी इतर नाट्यगृहांची आवश्यकता असतेच. त्यामुळे पर्याय म्हणून रंगकर्मी उपनगरातील नाट्यगृहांकडे बघतात. मात्र या नाट्यगृहांमध्ये नाटकासाठी आवश्यक सुविधाच नाही. काही ठिकाणी ध्वनीव्यवस्था निर्मात्यांनाच करावी लागते. स्वच्छता तर अजिबातच नसते. या नाट्यगृहांतील रंगमंचाची मापे नाटकाला साजेशी नाहीत, पडद्यामागून ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा नाही, नटांच्या चेहऱ्यावर लाईट येतील, असे लाईटचे बार आहेत. अशा अगणित समस्या आहेत. या कारणांमुळे भाडे अधिक असले तरी प्रयोगासाठी नाईलाजाने खाजगी नाट्यगृहांकडे वळावे लागते.’

नियोजित राज्य नाट्य स्पर्धा रद्द

महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ६० व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्राची फेरी यंदा गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार होती. त्याबाबत अधिकृत घोषणाही झाली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने दुर्लक्षित नाट्यगृहांकडे लक्ष वेधले जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, नाट्यगृहातील गैरसोयींअभावी हे नियोजन रद्द करण्यात आले. मेकअप रुमची दुरावस्था, नाटकासाठी आवश्यक असलेले माईक, नेपथ्याचे मूलभूत साहित्य उपलब्धच नाही, पंख्यांच्या आवाजामुळे कलाकारांचा आवाज ऐकू जात नाही, अशा अनंत अडचणींमुळे या ठिकाणी स्पर्धा घेताच आली नाही. अखेर सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरमध्ये ही स्पर्धा पार पडली.

‘एकाच छापाचे सर्व नाट्यगृहे’

ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक सतीश आळेकर म्हणाले, ‘महापालिकेने अनेक नाट्यगृहे बांधून ठेवली आहेत. मात्र ही सर्व नाट्यगृहे एकाच पद्धतीने बांधण्यात आली आहेत. वेगळ्या प्रकारची ‘परफॉर्मन्स स्पेस’ उपलब्ध करून देणारे नाट्यगृह यात नाही. प्रत्येक नाट्यगृह व्यावसायिक नाटकांसाठी बांधण्यापेक्षा प्रायोगिक, लोकनाट्य अशा नाटकांसाठी विविध प्रकारांची नाट्यगृहे बांधता आली असती. प्रकाशयोजना, नेपथ्य, ध्वनी आदींच्या नवनवीन प्रकारांचा शोध लागला आहे. याही बाबींचा विचारनाट्यगृहे बांधताना व्हायला हवा होता. परंतु, धोरण आखताना प्रशासन रंगकर्मींना विश्वासात घेत नाही, हीच खंत आहे.’



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply