पुणे : राज्यात बनावट अकृषिक दाखले, भोगवटा पत्र देऊन दस्त नोंदणीची २१७ प्रकरणे; पुणे, नांदेड, लातूरमध्ये गुन्हे दाखल

पुणे : बनावट अकृषिक दाखले (नॉन ॲग्रिकल्चर टॅक्स – एनए), भोगवटा पत्र, नियमितीकरण दाखले देऊन दस्त नोंदणी केल्याची राज्यात २१७ प्रकरणे निदर्शनास आल्याची कबुली राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात दिली. या प्रकरणी नांदेड, लातूर आणि पुण्यात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

बेकायदा दस्त नोंदणीबाबत लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी बनावट अकृषिक आदेश तसेच गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्र तयार करून दुय्यम निबंधकांची म्हणजेच शासनाची फसवणूक करून दस्त नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी संबंधित दस्तऐवजांत बनावट अकृषिक आदेश, बनावट गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्राचा वापर संबंधित नागरिकांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सह दुय्यम निबंधक नांदेड क्रमांक एक कार्यालयाने ८२ दस्तांमध्ये ६९ व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. सह दुय्यम निबंधक दोन कार्यालयाने नोंदणी झालेल्या एकूण एका दस्तात एका व्यक्तीवर, तर दुय्यम निबंधक कार्यालय तीनने १२ दस्तांमध्ये १३ व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच लातूर जिल्ह्यात बेकायदा दस्त नोंदणीची पाच प्रकरणे समोर आली असून या प्रकरणी सात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.’

सह जिल्हा निबंधक वर्ग-एक, पुणे शहर यांनी पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर पैकी सह जिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सह दुय्यम निबंधक वर्ग-दोन, हवेली क्र. २४ या कार्यालयात बेकायदा दस्त नोंदणीची तीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यानुसार चालू वर्षी २७ जानेवारी रोजी बेकायदा दस्त नोंदणीबाबत विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने दस्त नोंदणीचे हवेली क्र. तीन या कार्यालयातील ५ ऑक्टोबर २०२१ ते २५ जानेवारी २०२२ या कालावधीत नोंदविलेल्या दस्तांची तपासणी केली. त्यामध्ये बनावट एनए आदेश, भोगवटा पत्र किंवा नियमितीकरण दाखला असलेली एकूण ११५ प्रकरणे आढळून आली आहेत.

कायदेशीर कारवाईचा बडगा
पुण्यातील बेकायदा दस्त नोंदणींपैकी २६ प्रकरणांत ११ गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ८६ प्रकरणांत बनावट दाखल्यांची सत्यता पडताळणी करण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. ही पडताळणी झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच हवेली क्र. २४ येथील पाच प्रकरणांत पुण्यातील दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असेही महसूलमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply