पुणे : मार्केट यार्डचे स्थलांतर करावे का? शरद पवार यांचा पुण्यातील व्यापाऱ्यांना सवाल

पुणे : धान्य-भाजीपाल्याची आवक, वाढलेली रहदारी आणि वाहतुकीची कोंडी यामुळे आता गु लटेकडी येथील मार्केट यार्डचे पुन्हा स्थलांतर करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी (२२ मे) उपस्थित केला. सध्याची जागा पुरेशी पडत नसेल तर उद्याचा विचार करून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची वेळ आली आहे, असेही पवारांनी सांगितले. दि पूना मर्चंटस चेंबरच्या वतीने ‘व्यापाराचे विद्यापीठ‘ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

मी राज्याचा प्रमुख असताना १९७८ मध्ये नाना-भवानी पेठ येथील बाजारपेठ मार्केट यार्ड येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दि पूना मर्चंटस चेंबरचे त्यावेळचे अध्यक्ष उत्तमचंद ऊर्फ बाबा पोकर्णा यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी या निर्णयाला समर्थन दिले होते, अशी आठवण पवार यांनी जागविली. स्थलांतरामुळे व्यापार वाढला, पण आता येथे होत असलेली आवक, वाढती रहदारी आणि वाहतूक कोंडी यामुळे पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे का? असा सवाल त्यांनी व्यापाऱ्यांना केला.

व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत टाटा उद्योगसमूह, वालचंद हिराचंद, बजाज, किर्लोस्कर, कल्याणी या कुटुंबांच्या कार्याचा दाखला पवार यांनी आपल्या भाषणात दिला. या सर्वांनी शून्यातून सुरुवात केली. कष्ट, प्रामाणिकपणा, ग्राहकांप्रती बांधिलकी ही भूमिका अंतःकरणात ठेवून या सर्वांनी आपला उद्योग विस्तारला. संकटाच्या काळात नफा न घेता सर्वांनी राज्याच्या प्रगतीमध्ये आपले योगदान दिले. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी वाटचाल करावी, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

“ज्यांचा सन्मान करण्यात आला त्या यादीवर नजर टाकली तर बहुतांश जण ‘बीएमसीसी’ या एकाच महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे ध्यानात येते. आपल्यावर संस्कार करून जीवनामध्ये यशस्वी करणाऱ्या महाविद्यालयातील युवा पिढीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःची मदत म्हणून मी पाच लाख रुपये जाहीर करतो,” अशी घोषणाही शरद पवार यांनी केली.

उत्तमशेठ पोकर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षे काम करण्याची संधी मिळाली. ती पुंजी मला आयुष्यभर पुरत आहे, अशी भावना विठ्ठल मणियार यांनी व्यक्त केली. सहा वर्षात दोन पदव्या मिळाल्या. पण, उत्तरीय परिधान करून छायाचित्र टिपून घेण्यासाठी साठ वर्षे वाट पाहावी लागली, अशी नर्मविनोदी टिप्पणी त्यांनी केली. 

प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार आणि माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले या वेळी उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. बाबा आढाव, उद्योजक विठ्ठल मणियार, पणन संचालक सुनील पवार, ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, कन्हैयालाल गुजराथी, जयराज ग्रुपचे जयराज शहा, जितोचे विजय भंडारी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, अभय छाजेड, राजकुमार चोरडिया, विलास भुजबळ, श्याम अगरवाल, राजेंद्र गुगळे, ॲड. एस. के. जैन, अजित सेठिया, राजेश सांकला, राजेश फुलफगर, मोहन ओसवाल, राजेंद्र बोरा, प्रकाश पारख, हर्षकुमार बंग, राजेंद्र चांडक यांना ‘मास्टर ऑफ बिझनेस’ या पदवीने सन्मानित करण्यात आले.

विद्याधर अनास्कर आणि राजेश शहा यांनी मनोगत व्यक्त केले. बाठिया यांनी प्रास्ताविक केले. बोरा यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply