पुणे : देशातील ३९ लष्करी शेती व दुग्धशाळा अखेर बंद

पुणे: देशातील ३९ लष्करी शेती व दुग्धशाळा (मिलिटरी फार्म) अखेर बंद करण्यात आल्या आहेत. यासाठी नुकतेच दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे ‘ध्वज समारंभा’चे आयोजन करत अधिकृत पद्धतीने फार्म बंद करण्यात आले. शेकटकर समितीने यासंबंधीची शिफारस केली होती.

संरक्षण विभागाचा खर्च कमी करण्यासाठी, तसेच लष्करी शेतीच्या हजारो एकर जमिनीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर व्हावा, यासाठी २०१६ मध्ये लेफ्टनंट जनरल दत्तात्रेय शेकटकर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संरक्षण मंत्रालयाला शिफारसी पाठविल्या होत्या. यात लष्करी शेती बंद करण्याचा प्रस्ताव देखील होता. संरक्षण मंत्रालयाने २०१७ मध्ये ते बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी याबाबत विरोध केला आणि उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती. अखेरीस सर्व प्रक्रिया पूर्ण करत ३० मार्च २०२२ रोजी लष्कराच्या ३९ लष्करी शेतीला बंद करण्यात आले आहे.

याबाबत लेफ्टनंट जनरल शेकटकर (निवृत्त) म्हणाले, ‘‘देशात श्रीनगर, आग्रा, लखनौ, मेरठ, कोलकाता अशा विविध राज्यांमध्ये संरक्षण विभागाच्या जमिनीवर ३९ ठिकाणी लष्करी शेती आहे. खडकी येथे ही एक शेती असून, ती सुमारे १०० एकर जागेत आहे. लष्करात अशा दुग्धशाळांचा वापर अत्यंत कमी झाला असून, या सर्व गोष्टींसाठी आता विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे गायांची देखभाल, चारा, कर्मचारी आदींचा खर्च कमी करणे गरजेचे होते. तसेच मिलिटरी फार्मच्या जागांचा वापर देखील लष्कराच्या विविध विभागांसाठी कार्यालयाच्या स्वरूपात केला जाऊ शकतो, या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.’’

येथील गायी संगोपनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि विविध राज्यांना दिल्या जाणार आहेत. तसेच मिलिटरी फार्ममधील कर्मचाऱ्यांना इतर विभागांमध्ये नियुक्त केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

स्वातंत्र्यापूर्वी १ फेब्रुवारी १८८९ रोजी पहिली लष्करी शेती अलाहाबाद येथे तयार करण्यात आली होती. ब्रिटिश सैन्याला दुधाचा पुरवठा व्हावा, या अनुषंगाने या लष्करी शेतीची सुरवात झाली होता. तसेच स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजेच १९४७ मध्ये त्यांच्या संख्येत ही वाढ झाली. त्यावेळी हे मिलिटरी फार्म सैन्यासाठी अत्यंत फायदेशीर होते. मात्र, आता त्यांचा वापर देखील कमी झाला होता. मात्र त्या प्रमाणात खर्चात मोठी वाढ झाली होती.

  • देशातील मिलीटरी : ३९
  • गायींची संख्या : २५,०००
  • लष्करी शेतीवर होणारा वार्षिक खर्च : २८० कोटी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply