पुणे : गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश मागे

पुणे : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १३ जुलै रोजी प्रसृत केले होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने हे आदेश मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा मनमुराद आनंद पुन्हा घेता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत होता. हवामान विभागाने गेल्या आठवड्यात जिल्ह्याला मुसळधार पावसाचा लाल रंगाचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता

याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे म्हणाले, ‘जिल्हा प्रशासनाने काढलेले आदेश १४ ते १७ जुलै या कालावधीसाठी प्रसृत करण्यात आले होते. जिल्ह्यातील पाऊस बऱ्यापैकी ओसरला आहे. त्यामुळे जमावबंदीचे आदेश सध्या लागू नाहीत. पुन्हा मुसळधार पाऊस परतल्यास किंवा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आल्यास योग्य ते आदेश प्रशासनाकडून काढले जातील. तूर्त जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळे या ठिकाणी पर्यटकांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. मात्र, पर्यटकांनी निसर्गरम्यस्थळी गेल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.’

पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल आणि त्या ठिकाणी पाऊस, दाट धुके असेल तर स्थानिक गावातील एखादा मार्गदर्शक सोबत न्यावा. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने दाट धुके असल्यास गाडीचे दिवे आणि पार्किंग दिवे चालू ठेवून गाडी चालवावी. पर्यटनस्थळी सुरक्षारक्षक भिंती, लोखंडी कडे नसल्याने धबधब्याच्या प्रवाहात उतरू नये, सर्व पर्यटकांची सायंकाळी चार वाजण्यापूर्वी परतीच्या प्रवासाला लागावे. रस्ते अरुंद असल्याने आपली वाहने रस्त्यावर लावू नयेत. रस्त्यावर अचानकपणे चिखल होणे, दरड कोसळणे, रस्ता निसरडा होणे हे प्रकार होऊ शकतात. त्या दृष्टीने वाहने चालवावीत. जे वाहन चालक या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही बनोटे यांनी स्पष्ट केले.

संकटकाळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

जिल्ह्यात संकटकाळी १०७७ या टोल फ्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२०-२६१२३३७१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून हा कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply