पुणे : खडकवासला ते फुरसुंगीपर्यंतच्या भूमिगत बोगद्याचा अहवाल जलसंपदाकडे विभागाकडे सुपूर्द

पुणे : खडकवासला धरणातून नवीन मुठा कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची चोरी, बाष्पीभवन, गळती यावर उपाय म्हणून शहरातून वाहणारा हा कालवा भूमिगत करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठीचा प्राथमिक अहवाल संबंधित कंपनीने जलसंपदा विभागाकडे सुपूर्द केला आहे. या अहवालाची छाननी करून तो मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.

या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार निविदा मागवून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आले. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ज्या मार्गाने बोगदा जाणार आहे, त्या मार्गावरील जमिनींची (मृदा) तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर बोअर खोदण्यात आले होते. प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल संबंधित कंपनीने जलसंपदा विभागाकडे सुपूर्द केला असून जलसंपदाकडून अहवालाची छाननी सुरू आहे. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो मान्यतेसाठी जलसंपदा विभागाकडून शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भूमिगत बोगदा करताना ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. परिणामी शहरातील इमारतींना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे शहरातील इमारतींच्या खालून बोगदा करण्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. खडकवासला ते फुरसुंगी परिसरातील नागरी वस्ती नसणाऱ्या भागातून बोगदा प्रस्तावित करण्यात आला असून या प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्याची दोन हजार हेक्टर जागा असून या जागेची किंमत चालू बाजार मूल्य तक्त्यानुसार (रेडीरेकनर) १२ ते १५ हजार कोटी रूपये आहे, असेही जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

प्राथमिक आराखड्यात काय?

७.८० मीटर रूंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंच अशा आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचा प्राथमिक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षणाने फुरसुंगीपर्यंत नेण्याचे प्रस्तावितत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply