पुणे : अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्यांचाच पुढाकार

पुणे : अतिरिक्त उसाचे गाळप वेळेत आणि नियोजनपूर्वक करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांचे प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे पाच ऑक्टोबरला कारखान्यांचे बॉयलर पेटवून कामगार कामावर रुजू होताच कारखाने सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.  मागील गळीत हंगामात कोल्हापूर विभाग वगळता सर्वत्र आणि विशेषकरून मराठवाडय़ात गळीत हंगाम १३ जूनपर्यंत सुरू होता. उन्हाळय़ाच्या दिवसांत ऊसतोडणी मजुरांची मोठी टंचाई, घटणारा साखर उतारा आणि कारखाने पूर्ण क्षमतेने न चालल्यामुळे यंदा कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठय़ा प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. हे सर्व द्रविडी प्राणायाम टाळण्यासाठी विशेषकरून मराठवाडय़ातील कारखानदार दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांची धुराडी पेटवून कामगार कामावर रुजू होताच गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन आहे.

या बाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, ‘‘यंदाचा गळीत हंगाम काहीही करून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करावाच लागणार आहे. पाच ऑक्टोबरला दसरा आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांची धुराडी पेटविण्याचे नियोजन आहे. पण, ऊसतोडणी मजूर दसरा झाल्याशिवाय कामावर येणार नाहीत. ते कामावर येताच हंगाम सुरू करणार आहोत.’’

आर्थिक कसरत करावी लागणार

केंद्र सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ केली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वच घटकांची महागाई झाली आहे. साखरेचा प्रति किलो उत्पादन खर्च ३५ ते ३६ रुपये असताना साखर ३१ रुपये प्रति किलो दराने विकावी लागत आहे. एफआरपी वाढवली तरी साखर विक्री दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे साखर जास्त तयार केली तर कारखाने जास्त तोटय़ात जातात. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन झाले, की उर्वरित साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवावी लागणार आहे. यंदा जागतिक परिस्थिती साखर निर्यातीस पोषक होती. पण, पुढील हंगामात अशी स्थिती राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. भारतीय साखर जगात सर्वात महाग असते. त्यामुळे कारखानदारांना जागतिक बाजारात साखर विक्री करण्यासाठी केंद्राने मदत करणे गरजेचे असते. आता साखर निर्यात बंद असली तरीही ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून पुन्हा साखर निर्यात सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे, असेही जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले.

यंदाचा गळीत हंगाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करावाच लागणार आहे. मराठवाडय़ातील कारखान्यांना अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करावे लागणार आहे. इथेनॉल निर्मिती, बायो सीएनजी सारखे पर्याय कारखान्यांना सक्षमपणे हाताळावे लागणार आहेत. मागील हंगामासारखा हा हंगाम आर्थिकदृष्टय़ा सोयीचा जाईलच असे नाही. जागतिक घडामोडींचा हंगामावर मोठा परिणाम होत असतो. केंद्राने साखर विक्री दरात वाढ करायला हवी.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply