जळगाव : अतिवृष्टी आणि मंदीचा फटका : कापूस निर्यातीवर परिणाम

जळगाव : अतिवृष्टीने यंदा कापूस उत्पादन १५ ते २० टक्के घटले असून त्यास सध्या प्रति क्विंटलला सात ते नऊ हजारांचा भाव मिळत आहे. मंदीच्या प्रभावाने आगामी काळात भाववाढीची शक्यता कमी आहे. सद्य:स्थितीत सूतगिरण्यांमधून कापसाला मोठी मागणी आहे. युरोपीय देशांसह अमेरिकेतही कापूस निर्यात होत आहे. बांगलादेशातही थोडय़ाफार प्रमाणात कापूस निर्यात सुरू झाली आहे. खान्देशातील जळगावसह धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. गतवर्षी कापसाला नऊ ते १३ हजारांपर्यंत भाव मिळाल्याने यंदा कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढले. ती ११० टक्क्यांवर झाली. त्यात कोरडवाहू कपाशीची लागवड तीन लाख चार हजार ३३ हेक्टर, तर बागायती लागवड दोन लाख ३९ हजार २२९ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली. जिल्ह्यात गतवर्षी २०२१-२२ मध्ये साडेपाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. सुरुवातीला चांगली पीकस्थिती होती. जेव्हा कपाशीला बोंडे लागली, तेव्हा नेमकी अतिवृष्टी झाली. त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला. केवळ १० ते २० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात आले होते. यामुळे कापसाची टंचाई भासली होती. जिनिंग प्रेसिंग उद्योग चालविण्यासाठी कापसाची मोठी गरज असल्याने त्यांनी सुरुवातीला नऊ हजारांचा भाव दिला गेला. नंतर गरज वाढली आणि कापूस कमी यांमुळे मार्चमध्ये साडेनऊ हजारांचा भाव मिळाला होता. सध्या कापूस वेचणीही सुरू आहे. वेचणीवेळीच पाऊस होत असल्यामुळे कापसाचे उत्पादन घटणार आहे. भाव चांगला असल्याने तूट भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. खान्देशात २२५हून अधिक जिनिंग प्रेसिंग उद्योग आहेत. आता कापसाचीही आवक होत आहे. खान्देशातून कापसाला गुजरातमध्ये अधिक मागणी असून तेथील व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कापसाची खरेदी करीत आहेत. सध्या खान्देशातून गुजरातमध्ये कापूस जात आहे. देशात केळीपाठोपाठ कापूस उत्पादनात तसेच निर्यात करण्यात जळगाव अग्रेसर जिल्हा आहे. देशात कपाशीचे १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून, उत्पादकता ४६९ किलो रुई प्रतिहेक्टर आहे. देशात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ५.६४ क्विंटल आहे, तर राज्यात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ३.७५ क्विंटल आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी आहे. कापसाची सर्वाधिक निर्यात होणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशचा समावेश असून तेथे मंदीमुळे निर्यातीच्या फारशा संधी नाही. सध्या थोडय़ाफार प्रमाणात तेथे निर्यात होत आहे. आता कापड उद्योगात कापसाला पर्याय म्हणून पॉलिस्टरचा वापर वाढला आहे. जागतिक मंदीमुळे कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेल्या संधी फारशा शाश्वत नाहीत. त्यामुळे भारतीय कापसाला देशांतर्गत मागणी असेल. त्यात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे भाव हमी भावापेक्षा अधिक आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सात ते नऊ हजारांचा भाव आहे. दरम्यान, गतवर्षी जादा भाव देऊनही कापूस मिळत नसल्याने जुलैपर्यंत चालणारा जिनिंग उद्योगाचा हंगाम मार्चमध्येच बंद झाला होता. जिनिंग उद्योगाला गतवर्षी कोटय़वधींचा तोटा सहन करावा लागला होता.

सध्या जागतिक मंदी सुरू आहे. त्यामुळे कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेल्या संधी फारशा शाश्वत नाहीत. खान्देशात यंदा अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असून दर्जाही खालावणार आहे. काही भागांत पावसामुळे बोंडे काळी पडून कापूस लाल झाल्याचे दिसून येत आहे. युरोपीय देशांसह अमेरिकेतूनही कापसाला चांगली मागणी आहे. खान्देशातील सर्व २२५हून अधिक जिनिंग प्रेसिंग सुरू असून, कापसाला चांगला भाव मिळत आहे. एकंदर स्थिती लक्षात घेता पुढील काळात भाव वाढण्याची शक्यता नाही.

– अरविंद जैन, उपाध्यक्ष, खान्देश जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशन



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply