गोवरचिंता वाढली!; मुंबईत गोवरचा आणखी एक संशयित मृत्यू; मृतांची संख्या १०, रुग्णसंख्या २०८

मुंबई : गोवंडी येथे एका सव्वा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोवरच्या संशयित मृतांची संख्या १० झाली आहे. यातील एक मृत्यू मुंबईबाहेरील भिवंडी येथील आहे. गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून सोमवारी मुंबईमध्ये २४ नवे रुग्ण आढळून आले असून, रुग्णांची संख्या २०८ झाली आहे. तसेच सोमवारी २२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असताना मुंबईत गोवरने आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. हा मृत्यू संशयित असून मुंबईतील मृतांची संख्या १० झाली आहे. गोवंडी येथे एका सव्वा वर्षांच्या मुलीला ३ नोव्हेंबरला ताप आणि खोकला सुरू झाला. ५ नोव्हेंबरला तिच्या अंगावर पुरळ दिसू लागले. ११ नोव्हेंबरला तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. १३ नोव्हेंबरला तिला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. २१ नोव्हेंबरला तिचा गोवरमुळे हृदय निकामी होऊन मृत्यू झाला. या मुलीवर ती पाच महिन्यांची असताना शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दरम्यान, मुंबईमध्ये सोमवारी २४ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या २०८ झाली आहे. सोमवारी मुंबईच्या गोवंडी विभागात सर्वाधिक ६ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल कुर्ला ५, अंधेरी पूर्व ३, प्रभादेवी, गोरेगाव आणि कांदिवली या विभागामध्ये प्रत्येकी दोन, तर भायखळा, माटुंगा, भांडुप, चेंबूर विभागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तसेच सोमवारी मुंबईमध्ये १७२ संशयित रुग्ण आढळल्याने संशयित रुग्णांची संख्या ३ हजार २०८ झाली आहे. संशयित रुग्णांना २४ तासांच्या अंतराने जीवनसत्त्व ‘अ’चे दोन डोस देण्यात येत आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या ९४ रुग्णांपैकी ६७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, २६ रुग्णांना प्राणवायू, तर एक रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.

लसीकरणाची ११६० सत्रे 

गोवरचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईमध्ये गोवरच्या लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांसाठी अतिरिक्त लसीकरण शिबिरे घेण्यात येत आहेत. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून आतापर्यंत मुंबईमध्ये ११६० सत्रे घेण्यात आली. त्यातून ९०८० मुलांना एमआर १, तर ७७९७ मुलांना एमएमआर लशीचे डोस देण्यात आले. यामध्ये सोमवारी झालेल्या २७६ सत्रांमध्ये ८८१ मुलांना एमआर १, तर ९८७ मुलांना एमएमआर लशीच्या मात्रा दिल्या आहेत.

धारावीतील सर्व बालकांचे १० दिवसांत लसीकरणाचे उद्दिष्ट

मुंबई : मुंबईतील आठ विभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला असताना धारावीमध्ये गोवरचा उद्रेक होण्यापूर्वी पालिकेच्या जी/उत्तर विभाग सज्ज झाला आहे. त्यानुसार पुढील १० दिवसांमध्ये लसीकरणापासून वंचित असलेल्या आणि नऊ महिने पूर्ण होणाऱ्या धारावीतील सर्व बालकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. धारावीसारख्या मोठय़ा झोपडपट्टीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या हे मोठे आवाहन आहे. त्याचप्रमाणे काही प्रमाणात लसीकरणविषयी उदासीनता व विरोधही दिसून येतो. त्यामुळे गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी पालिकेच्या जी/उत्तर विभागाने घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून लसीकरण न झालेले, अर्धवट लसीकरण झालेले तसेच पुढील १० दिवसांमध्ये नऊ महिने पूर्ण होणाऱ्या बालकांची माहिती गोळा केली. यातून ३०८ मुलांचे तातडीने लसीकरण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या बालकांचे गोवरविरोधी लसीकरण बाकी असेल त्याचे लवकरात लवकर लसीकरणासाठी जी/उत्तर विभागाने कंबर कसली आहे. पुढील १० दिवसांत धारावीतील ३ लाख १० हजार लोकांचे सर्वेक्षण करण्याचे तसेच लसीकरणापासून वंचित असलेल्या या ३०८ मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असून, ३०८ मुलांमधील ४५ मुलांना गोवर लशीचा पहिला डोस देण्यात आला असल्याची माहिती जी/उत्तर विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दिली.

सत्तर वर्षांवरील नागरिकांना लागण होण्याचा धोका

मुंबई : सध्या गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून १८ वर्षांवरील दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र लहान मुलांप्रमाणेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही गोवरची लागण होण्याचा शक्यता निर्माण झाली आहे.मुंबईतील गोवरचा वाढता धोका लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मुंबईत गोवरच्या साथीचा उद्रेक झाल्याने महापालिकेने गोवरचे लसीकरण करण्यावर अधिक भर दिला आहे. येत्या १० दिवसांत लशीपासून वंचित बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टय़े ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक बालकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण शिबिरे घेण्यात येत आहेत. बालकांची काळजी घेण्याकडे सर्वजण लक्ष देत असतानाच ज्येष्ठ नागरिकांनाही गोवरची लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. ज्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, त्यांना गोवरची लागण होण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. मात्र ज्यांनी लस घेतलेली नाही, अशांना लागण होण्याची शक्यता अधिक असते. गोवरची प्रथम लस १९६३ नंतर देण्यास सुरुवात झाली. १९८५ पासून सार्वत्रिक लसीकरण मोहीमेत गोवरच्या लसीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी जन्मलेल्या व्यक्ती सध्या ६० ते ७० वर्षे वयोगटात आहेत. या व्यक्तींना रक्तदाब, मधुमेह या व्याधी असल्यास त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यातच परिसरात गोवराचा रुग्ण आढळल्यास लस न मिळालेल्या ज्येष्ठांनाही होण्याची शक्यता असते, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. 

‘वयोवृद्ध व्यक्तींसाठी लसीकरण नाही!’

मुंबई महापालिकेकडून बालकांना गोवरची लस देण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. त्यामुळे या वयोगटातील बालकांचेच लसीकरण होत आहे. मात्र वयोवृद्ध व्यक्तींना सध्या तरी कोणतीही लस देण्याच्या सूचना दिल्या नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.



हे पण वाचा-

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply