दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांनी सांगितलं काळजी घेणं का गरजेचं?

देशात पुन्हा एकदा कोरोनाची भीती सतावू लागली आहे. एका आठवड्यात गुजरातमध्ये 89%, हरियाणामध्ये 50% आणि दिल्लीत 26% कोरोना रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये एका व्यक्तीला XE व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल लागली आहे. चीन आणि अमेरिकेत कोविडची वाढती प्रकरणे पाहता केंद्रानं 5 राज्यांनाही इशारा दिलाय.

गुजरात, हरियाणा आणि दिल्लीमध्ये कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णांमध्ये वाढ झालीय. दिल्लीत 4 ते 10 एप्रिल दरम्यान कोरोनाचे 943 रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत ही 26% वाढ आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत कोरोनाचे 751 रुग्ण आढळले होते. या काळात दिल्लीत कोरोना चाचणीही कमी होत आहे. असे असूनही, गेल्या काही दिवसांपासून येथील सकारात्मकता दर 1% पेक्षा जास्त राहिला आहे.

दिल्लीतील कोविड (Coronavirus in Delhi) पॉझिटिव्ह दरात अचानक वाढ झाल्यानं तज्ञांनी निदर्शनास आणून दिलं की, या क्षणी घाबरण्याची काहीच गरज नाही. परंतु, सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे, असं म्हंटलंय. गेल्या एका आठवड्यात राष्ट्रीय राजधानीत कोविड पॉझिटिव्ह दर 0.5% वरून 2.70% वर गेला आहे. तर, सोमवारी शहरात 137 प्रकरणं नोंदवली गेली आणि सकारात्मकता दर 2.70% इतका होता. जो गेल्या 2 महिन्यांतील सर्वोच्च आहे. 5 फेब्रुवारी रोजी चाचणी सकारात्मकता दर 2.87% होता, असं स्पष्ट झालंय.

अचानक झालेल्या वाढीमुळं दिल्लीतील अग्रगण्य रुग्णालयांतील डॉक्टरांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. सध्या भीतीदायक परिस्थिती नसली, तरी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आत्मसंतुष्टतेची भावना ही चिंतेची बाब बनलीय. फोर्टिस रुग्णालयातील पल्मोनोलॉजीच्या सल्लागार डॉ. रिचा सरीन (Dr Richa Sareen) म्हणाल्या, 'कोविड प्रकरणांमध्ये सतत वाढ होत आहे. सकारात्मकतेचं प्रमाणही वाढत आहे. परंतु, घाबरण्याची काहीच गरज नाहीय. कारण, दैनंदिन प्रकरणांची संख्या अजूनही 130-150 च्या श्रेणीत आहे. मात्र, सतर्क राहण्याची आवश्यकता देखील आहे.'

अपोलो रुग्णालयातील डॉ. सुरणजीत चॅटर्जी (Dr Suranjit Chatterjee) यांनी सांगितलं की, कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी-जास्त असला तरी तोंडाला मास्क लावणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही महामारी कमी होत नाही, तो पर्यंत मास्क लावणं आवश्यक आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, असं त्यांनी आवाहन केलंय. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील (RGSSH) वरिष्ठ डॉक्टर म्हणाले, 'ही महामारी ओमिक्रॉनपेक्षा सौम्य असेल की, डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असेल याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळं काळजी घेणं हाच पर्याय आपल्याकडं उरतो. मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आत्मसंतुष्टतेची भावना निर्माण झालीय आणि हिच चिंतेची बाब बनलीय. लोक स्वतःची चाचणी घेत नाहीयत. ते फक्त घरीच सौम्य ताप आणि सर्दी उपचार घेत आहेत. सध्या घाबरण्याची गरज नाहीय, परंतु आपण सतर्क राहिलं पाहिजे.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply